अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना इस्लामिक स्टेट(आयसिस) या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन करण्यासंदर्भात सहकार्यासाठी गोपनीयरित्या पत्र पाठविल्याची माहीती समोर आली आहे. गेल्याच महिन्यात ओबामांनी हे पत्र लिहीले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमासंदर्भात चर्चेची २४ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. इस्लामिक स्टेट या दहशवादी संघटनेविरोधात एकत्र लढण्यात इराण व अमेरिका दोघांचेही हित असून या लढ्यात इराणने सहकार्य केल्यास आण्विक कार्यक्रमासंदर्भातील चर्चेमध्ये इराणला त्याचा फायदा होईल, असे ओबामांनी या पत्राव्दारे सुचविले आहे. या पत्रव्यवहाराचे वृत्त व्हाईट हाऊसने देखील फेटाळलेले नाही.  दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये वैयक्तीकस्तरावरील पत्रव्यवहाराबद्दल टिपण्णी करणे योग्य नसल्याची भूमिका व्हाईट हाऊसने मांडली आहे.