प्रजासत्ताक दिनी राजपथावर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांच्या बाईकवरील कसरती पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारावून गेले. बीएसएफच्या ‘जाबांज’ तुकडीने केलेल्या बाईकवरील कसरतींना ओबामा यांनी राजपथावर उत्फुर्त प्रतिसाद दिला होता तर, पत्नी मिशेल ओबामा यांनी टाळ्यावाजवून दाद देत होत्या. मंगळवारी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात देखील ओबामा यांनी बीएसएफ जवानांच्या कसरती विशेष आवडल्याचे म्हटले.
सोमवारी राजपथावर बीएसएफच्या जवानांनी संचलनादरम्यान, बुलेटवरून पीकॉक रायडिंग, अॅक्रोबॅट, पॅरेरल बार, लोटस, जॅग्वार, बीएसएफ ट्री अशा अनेक चित्तथरारक कसरती केल्या होत्या. विशेष म्हणजे, यंदा बीएसएफचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. १९९० साली बीएसएफचे बाईक पथक निर्माण करण्यात आले होते. दरम्यान, २००६ साली या पथकाने तीन बुलेट मोटारसायकलीवरून २६ जणांना घेऊन जाण्याची कसरत दाखवून विक्रम केला होता. त्यानंतर पुढील काळात याच पथकाने केवळ एका मोटारसायकलीवर ४० जवानांना ३० किमी अंतर प्रतितास घेऊन जाण्याची थरारक कसरत करून नवा विक्रम केला.