स्पेनच्या बार्सिलोनामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. एक व्हॅनने पदपथावरील काही लोकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. व्हॅनच्या धडकेत अनेकजण जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्पॅनिश पोलिसांनी एका ट्विटच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली आहे. स्पेनच्या सरकारी वृत्तसंस्थेने या घटनेचा एक फोटो प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तीन जण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसत आहे.

बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना ‘भयावह’ असल्याचे पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे. यानंतर शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने लास रॅमब्लासमधील प्लाका काटालुनिया भागात न जाण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. याशिवाय जवळचे मेट्रो आणि रेल्वे स्थानक बंद करण्याच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत. एल पायस वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकांना चिरडल्यानंतर व्हॅनचा चालक फरार झाला आहे.

‘व्हॅनच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅनने पदपथावरील लोकांना चिरडल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले दोन जण त्याच भागातील एका हॉटेलमध्ये शिरले. या दोघांकडे हत्यारे असल्याचे वृत्तदेखील रॉयटर्सने दिले आहे. तर एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बार्सिलोना पोलिसांनी हा हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे.