राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात चेटकीण असल्याच्या संशयावरून एका महिलेला प्रचंड हाल करून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी या महिलेला विवस्त्र करून मारहाण केली तसेच तिला विष्ठाही खायला लावली. त्यानंतर तिला निखाऱ्यांवर झोपवण्यात आले आणि तिच्या दोन्ही डोळ्यांमध्ये निखारे घालण्यात आल्याचे समजते. या अमानुष अत्याचारामुळे महिलेचा मृत्यू झाला.

कन्या देवी असे या मृत महिलेचे नाव असून ती विधवा होती. २ ऑगस्टला कन्या देवीच्या दोन नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी तिला हाल करून मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या कृत्यानंतर कदेरा गावातील पंचायतीने आरोपींना पुष्कर तलावात स्नान करा आणि गुरांसाठी ट्रॅक्टरभर चाऱ्याची सोय करण्याचे प्रायश्चित घ्यायला लावून त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर पंचायतीकडून कन्या देवी यांच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले. तुम्ही पोलिसांकडे गेलात तर तुम्हाला समाजातून बहिष्कृत करू, अशी धमकी पंचायतीकडून देण्यात आली.

२ ऑगस्टला कन्या देवी त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाबरोबर घरी होत्या. त्या झोपल्या असताना नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी तिला पकडले. तिच्यावर वाईट पद्धतीने अत्याचार करण्यात आले. आरोपींनी त्यांना विष्ठा खायला लावली, मारहाण केली आणि चटके दिले. या प्रकरणी सहा आरोपींपैकी पाच जणांवर हत्या आणि अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सगळ्यांना अटकही झाली आहे, अशी माहिती अजमेरचे पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी दिली.

आरोपींमध्ये कन्या देवी यांची पुतणी पिंकी, पुतण्या महावीर आणि शेजारी राहणाऱ्या सोनियाचा समावेश आहे. भैरव बाबा नामक व्यक्तीने आम्हाला कन्या देवी चेटकीण असल्याचे सांगून तिला मारायला सांगितले होते, असा दावा या तिघांनी केलाय. मात्र, हे प्रकरण लावून धरणाऱ्या तारा अहुवालिया यांनी या सगळ्यापाठी संपत्तीचा वाद असल्याचा आरोप केला आहे. कन्या देवी यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचा मुलगाही लहान आहे. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची संपत्ती आण जमीन हडपायची होती, असे अहुवालिया यांनी सांगितले.

सुरूवातील कन्या देवी यांच्या मृत्यूची कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. मात्र, त्यांचा भाऊ महादेव रेगार कन्या यांच्या अंत्यविधीसाठी गेला असताना सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने ८ ऑगस्टला पोलिसांना याबद्दल कळवले. मात्र, सुरूवातीला पोलिसांनी पुरावे सादर करा, असे सांगून त्याची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर कन्या देवींची मुलगी माया हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर पोलिसांनी पाच आरोपींवर हत्येचा , पुरावे नष्ट करणे, अंधश्रद्धा कायद्याचे उल्लंघन आणि अनैसर्गिक मृत्यूच्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.