पश्चिम बंगालच्या आनंदपूरमध्ये राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यानं ब्लू व्हेल गेम खेळाचे टप्पे पार करत आत्महत्या केल्याची भीती वर्तविण्यात येते आहे. ब्लू व्हेल या गेममुळेच ही आत्महत्या झाल्याचं स्पष्ट झालं तर भारतातला हा दुसरा बळी असेल. मागील महिन्यात मुंबईतल्या एका मुलानं ब्लू व्हेल या खेळापायी आपलं आयुष्य संपवलं. आता असाच प्रकार कोलकात्याहून समोर येतो आहे. अंकन डे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे तो पश्चिम बंगालमधील आनंदपूरमधल्या शाळेत शिकत होता.

अंकन शनिवारी आंघोळीसाठी म्हणून बाथरूममध्ये गेला तो बाहेर आलाच नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना अंकनचा मृतदेह आढळून आला, अंकनच्या चेहऱ्याभोवती एक प्लास्टिकची पिशवी गुंडाळलेली होती आणि दोरीनं गळा आवळण्यात आला होता अशी माहिती अंकनच्या कुटुंबातील सदस्यानं दिली आहे. या अवस्थेत अंकनचा मृतदेह सापडल्यानं त्याचे पालक घाबरून गेले, त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता अंकन ब्लू व्हेल गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या एका मित्रानं दिली आहे.

मागील महिन्यातच अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. तर काही दिवसांपूर्वी इंदौरमधील एका विद्यार्थ्याला आत्महत्या करताना त्याच्या मित्रांनी वाचविल्याचीही बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता मात्र कोलकात्यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यानं केलेली आत्महत्या ब्लू व्हेल गेममुळे झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

ब्लू व्हेल या खेळामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. रशियातून या खेळाचं लोण जगभरात पसरताना दिसतं आहे रशियात या गेममुळे २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. १२ ते १६ या वयोगटातील मुलांकडे असलेल्या स्मार्ट फोनमध्ये हा गेम डाऊनलोड करण्याचं प्रमाण आणि या गेममुळे त्यांच्या आत्महत्या होण्याचं प्रमाण जास्त आहे.

नेमका आहे तरी काय आहे हा ब्लू व्हेल गेम?

ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या या गेममध्ये प्रत्येक प्लेयरला एक मास्टर मिळतो

अँड्रॉईडवरून हा गेम एकदा डाऊनलोड केला की डिलिट करता येत नाही.

रक्तानं ब्लू व्हेल कोरणं, भीतीदायक सिनेमा पाहणं असे टास्क दिले जातात

गेमचा मास्टर ५० दिवस प्लेयरवर नियंत्रण ठेवतो आणि सगळे टास्क पूर्ण करायला भाग पाडतो

हा गेम एकूण ५० लेव्हल्सचा आहे, यातील ५० वी लेव्हल आत्महत्या करणं आहे.

मनप्रीतच्या आत्महत्येनंतर या ब्लू व्हेल गेमची चांगलीच चर्चा रंगली होती. पालकांनी आपल्या मुलांकडे सजगतेनं पाहण्याची गरज आहे, त्यांच्या हातात स्मार्ट फोन दिल्यावर ते त्याचा वापर कसा करतात हे पाहणं पालकांचीही तेवढीच मोठी जबाबदारी आहे. पालकांनी ही जबाबदारी न घेतल्यास या खेळामुळे आणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.