पश्चिम बंगालमधील ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी तेथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकाऱयांनी मुंबई पोलीसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत मुंबईमधून एका आरोपीला अटक करण्यात आली. सिकंदर शेख ऊर्फ सलीम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपाडामध्ये त्याच्या मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आली.
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया म्हणाले, पश्चिम बंगाच्या पोलीसांकडे माहिती होती. ती त्यांनी आमच्याकडे देऊन आमच्या मदतीची मागणी केली. त्यांना आवश्यक ती मदत देण्यात आली. नागपाडामधून एकाला अटक करण्यात आली असून, त्याला घेऊन पश्चिम बंगालचे अधिकारी रवाना झाले आहेत.
पश्चिम बंगालमधील रनाघाट विभागातील स्थानिक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तीन ते चार दरोडेखोरांनी ननवर बलात्कार केला. या टोळक्याने तेथील कपाटातील १२ लाख रुपयेही चोरून नेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.