बंगळुरू शहरातील मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर रविवारी रात्री झालेला बॉम्बस्फोट दहशतवादी हल्लाच असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सोमवारी सांगितले. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता, तरी तो घडवण्यासाठी ‘आयईडी’चा वापर करण्यात आला होता.
चर्च स्ट्रीट परिसरातील ‘कोकोनट ग्रोव्ह’ हॉटेलच्या बाहेर रात्री साडे आठ वाजता हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे उडालेले र्छे शरीरात शिरून दोघे जण जखमी झाले. यापैकी भवानी देवी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या स्फोटानंतर मुंबईसह देशातील महत्त्वाच्या ठिकाणच्या विमानतळांवर ‘अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशमधील तुरुंगातून फरार झालेले ‘सिमी’ या संघटनेचे पाच दहशतवादी मुंबई, बंगळुरूसह देशातील काही महत्त्वाच्या शहरांत घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला होता.