शांघाय, सिलिकॉन व्हॅलीला मागे टाकत बंगळुरू शहराने प्रगतीशील शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) प्रगतीशील शहरांची नवी यादी जाहीर केली आहे. तंत्रज्ञानाचा आणि नाविण्यपूर्ण गोष्टींचा अंगिकार हे मुदे विचारात घेऊन प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. बंगळुरुसोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.

बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सिलिकॉन व्हॅली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. ‘प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरूने प्रथम स्थान मिळवले आहे. मी याबद्दल बंगळुरूवासियांचे आभार मानतो,’ असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने ३० प्रगतीशील शहरांची यादी तयार केली आहे. यामध्ये बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला स्थान देण्यात आले आहे.

प्रचंड वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, प्रदूषित तलाव आणि नुकत्याच घडलेल्या विनयभंगाच्या घटना यामुळे बंगळुरू चर्चेत राहिले आहे. बंगळुरू शहरातील अनेक भागांमध्ये पाणी आणि विजेची समस्या आहे. याशिवाय उद्योगस्नेही शहरांच्या यादीत केंद्राने बंगळुरूला तळाचे स्थान दिले आहे. मात्र बंगळुरूत मोठ्या प्रमाणात थेट परकीय गुंतवणूक आल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

पाणी आणि विजेच्या समस्या असलेले बंगळुरू शहर देशाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी समजली जाते. याशिवाय नवउद्यमींसाठी (स्टार्ट अप) बंगळुरूतील वातावरण पोषक समजले जाते. इन्फोसिससारख्या बड्या कंपन्यांची कार्यालये बंगळुरूत असल्याने देशभरातील हजारो तरुण-तरुणी बंगळुरूमध्ये नोकरीसाठी राहतात. या भागात असणारे काही बाजार नोटाबंदीनंतर कॅशलेस झाले आहेत.