एका साडे तीन वर्षाच्या मुलीचा शाळेच्या आवारात कर्मचाऱ्याने विनयभंग केला. या कर्मचाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  बंगळुरूतील एका शाळेत साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाला असून सध्या ती तिच्या पालकांसोबत सुरक्षित आहे. आम्ही संशयितास अटक केली आहे अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे आम्हाला इतका जबर धक्का बसला आहे की यापुढे आमची मुलं आम्ही शाळेत पाठवावी की नाही याचा आम्ही विचार करत आहोत असे एका विद्यार्थीनीच्या आईने म्हटले आहे.

सुरुवातीला शाळेनी या घटनेची दखल घेतली नाही. परंतु पालकांनी जेव्हा दबाव टाकला त्यानंतर त्यांनी कारवाई करण्याची तयारी दर्शवली असे एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पालकाने म्हटले आहे.

मागील आठवड्यामध्ये हवाईसुंदरीचा दुचाकीस्वारांनी विनयभंग केला होता. त्याची तक्रार नुकतीच दाखल करण्यात आली होती. या घटनेला काही तास उलटले देखील नाही तोच या दुसऱ्या वृत्तामुळे बंगळुरू पूर्णपणे हादरले आहे. आपले काम संपवून ही हवाईसुंदरी आपल्या घरी परतत असताना एका उच्चभ्रू वस्तीमध्ये दुचाकीस्वारांनी विनयभंग केला. तिने आणि तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरड केली त्यानंतर ते दुचाकीस्वार पळून गेले. त्या दुचाकीस्वारांनी तिचे कपडे फाडले. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी घरी परतणाऱ्या युवतीचा काही तरुणांनी मिळून विनयभंग केला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत सहा जणांना अटक केली. त्यामधून असे लक्षात आले होते की हे लोक तिच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेऊन होते. त्या आधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला शेकडो मुलींचा विनयभंग करण्यात आला होता. आपल्या नातेवाईक, कुटुंबियांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत नववर्ष साजरे करण्यासाठी गेलेल्या मुलींना या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.