मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यामागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण मोदी सरकारकडून देण्यात आले आहे.
कमला बेनीवाल यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. याची दखल घेत सरकारने योग्य कारवाई केली असून बेनीवाल यांची हकालपट्टी घटनात्मकरित्या आहे. त्यामागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू गुरूवारी दिले. तसेच हा निर्णय नियम आणि घटनात्मक चौकटीतच घेण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध दंड थोपटणाऱ्या कमला बेनीवाल यांची मिझोरामच्या राज्यपालपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर मोदी सरकारवर चहुबांजूनी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून व्यंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
८७ वर्षीय काँग्रेस नेत्या बेनीवाल या मूळच्या राजस्थानातील असून गुजरात सरकारविरोधात लोकायुक्त पदाच्या नेमणुकीवरून त्यांनी दंड थोपटले होते.