हजारो माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि ७५ हून अधिक विमान आणि जहाज गायब झालेल्या बर्म्युडा ट्रँगलचे अखेर रहस्य उलगडले आहे. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या फे-यात अडकून जहाज बुडू शकतात आणि विमानही समुद्रात पडण्याची दाट शक्यता असते असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

डेलीमेल या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार  संशोधकांनी बर्म्युडा ट्रँगलमध्ये तयार होणा-या ढगांना षटकोनी ढग असे नाव दिले आहे. या भागात १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारा वाराही असतो. यामुळे अशी परिस्थिती तयार होती की त्याची क्षमता एखाद्या बॉम्बस्फोटासारखी असते. ढगांना भेदत वाहणारे वारे समुद्राच्या लाटांवर येऊन आदळतात. त्यामुळे या लाटा अवघ्या काही क्षणातच रौद्ररुप धारण करतात. या लाटांची उंची त्सुनामीमुळे येणा-या लाटांच्या उंचीपेक्षाही जास्त असते. त्यामुळे आकाशातून जाणारे विमान असो किंवा समुद्रातून जाणारे जहाज हे या परिस्थितीत टिकाव धरु शकत नाही असे रेंडी सर्व्हनी यांनी सांगितले.  बर्म्युडाच्या दक्षिण बेटावरुन हे ढग तयार होतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. वा-यांमुळे बर्म्युडा ट्रँगलमध्ये षटकोनी ढग तयार होतात असा दावाही आता केला जात आहे.

अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरीडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो. पाच हजार किलोमीटरच्या या पट्ट्यात गेल्या शंभर वर्षात ७५ विमान आणि १०० हून अधिक जहाज या पट्ट्यात बेपत्ता झाले असून यामध्ये एक हजार जणांचा अद्याप काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही. विशेष म्हणजे या विमान किंवा जहाजांचे अवशेषही कधी सापडू शकलेले नाहीत. त्यामुळे बर्म्युडा ट्रँगल हा नेहमीच साहसवीर आणि संशोधकांना खुणावत असते.