घरापासून संसदेपर्यंतच्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडिया साईट्सवर टाकून अडचणीत आलेले आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे लेखी माफीनामा सादर केला. माझ्याकडून अनवधानाने चूक झाल्याचे भगवंत मान यांनी माफीपत्रामध्ये म्हटले आहे. मला केवळ शैक्षणिक व्हिडिओ तयार करायचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या माफीचेही राजकारण केले जात असल्याचा आरोप भगवंत मान यांनी केला आहे.
भगवंत मान यांच्या या व्हिडिओचे गंभीर पडसाद गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले होते. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली असून, त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मान यांच्यावर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मान यांना तूर्त संसदेमध्ये न येण्याची सूचना सुमित्रा महाजन यांनी केली आहे.
भगवंत मान यांना सभागृहातून निलंबित करण्याची मागणी जवळपास सर्वपक्षांकडून करण्यात आली. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही भगवंत मान यांच्या कृतीचा निषेध केला होता. त्यामुळे लगेचच सोमवारी सुमित्रा महाजन यांनी नऊ सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. भाजप खासदार किरीट सोमय्या हे या समितीचे अध्यक्ष आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्तही या समितीमध्ये आहेत. या समितीची बैठक मंगळवारी संसद भवनामध्ये पार पडली. तीन ऑगस्टपर्यंत या समितीला आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.