पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याच्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही, असे ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितले. मालवीय यांच्यापेक्षा अनेक महान भारतीय या सन्मानासाठी पात्र असताना हा सन्मान हिंदू महासभेचे नेते मालवीय यांना देण्यात आला अशी टीकाही त्यांनी केली.
गुहा यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न दिले हा निर्णय छानच झाला, पण मालवीय यांना तो सन्मान देणे योग्य नव्हते. निवर्तलेल्या व फार पूर्वी निवर्तलेल्या लोकांना देणे तर चुकीचेच आहे. जर मालवियांना भारतरत्न दिले तर टागोर, फुले, टिळक, गोखले, विवेकानंद, अकबर, शिवाजी महाराज, गुरू नानक, कबीर, सम्राट अशोक यांनाही ते मिळायला हवे होते. मालवियांना भारतरत्न देण्याचे समर्थन होऊ शकत नाही असे वाटते. राष्ट्रभक्ती व विद्वत्ता यामुळे त्यांना भारतरत्न दिले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, पण या क्षेत्रातही तसे अनेक महान भारतीय होऊन गेले आहेत.
 गोखले, टिळक, कमलादेवी, भगत सिंग यांनी स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले.
 शिक्षण व साहित्यात टागोरांनी मोठे योगदान दिले. गोखले, टिळक, भगत सिंग, कमलादेवी, टागोर व इतर महान लोक यांनी पंतप्रधानांच्या मतदारसंघात काम केलेले नाही, असे गुहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. यापुढे मरणोत्तर भारतरत्न देऊ नये व या सन्मानाचे राजकारण करणे थांबवावे असेही त्यांनी सांगितले आहे.