केरळमधील अरणमुला या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरातील खासगी विमानतळ प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाबाबत अभ्यास करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याने केरळमधील भाजप आणि संघ परिवाराला आपला रोष केंद्र सरकारकडे वळवावा लागला आहे. अरणमुला येथे विमानतळ उभारण्यास भाजप आणि संघ परिवार गेल्या अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत.
नजीकच्या भविष्यात या खासगी विमानतळ प्रकल्पाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे केरळ संघ परिवारातील ज्येष्ठ नेते के. राजशेखरन यांनी सांगितले. केंद्र सरकारने जनतेच्या विरोधात निर्णय घेतल्यास एनडीए सरकारला प्रतिस्पर्धी समजण्यास आम्ही कचरणार नाही, असे राजशेखरन यांनी स्पष्ट केले आहे.प्रस्तावित प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने घेतला त्यावर राजशेखरन यांनी टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा जनताविरोधी निर्णय रद्द करावा, असे ते म्हणाले. या लढय़ाच्या केवळ दोनच बाजू आहेत. एक जनताभिमुख आणि दुसरी जनताविरोधी आणि आम्ही जनतेच्या वतीने हा लढा देत आहोत, असे ते म्हणाले. मोदी सरकारने विमानतळाच्या विकासकांच्या बाजूने कौल दिल्यास आम्हाला एनडीए सरकारशी प्रतिस्पध्र्याप्रमाणे वागण्यावाचून अन्य पर्याय राहणार नाही, असा इशारा राजशेखरन यांनी दिला आहे.