डोकलामवरुन चीन आणि भारतमध्ये तणाव असतानाच चीनच्या नवीन दाव्यामुळे बुधवारी संभ्रम निर्माण झाला आहे. भूतानने डोकलामवर आमचा ताबा नाही असे स्पष्ट केल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र या दाव्याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नसून भूतान यावर स्पष्टीकरण कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चीनच्या राजनैतिक अधिकारी वांग वेन्ली मंगळवारी भारतात आल्या होत्या. पत्रकारांशी चर्चा करताना वांग वेन्ली यांनी भूतानने डोकलाम हा भाग त्यांच्या हद्दीत येत नाही असे मान्य केल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या दाव्याविषयी भूतानकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे वांग वेन्ली यांनी दिलेली माहिती ही भूतानच्या पूर्वीच्या भूमिकेशी विसंगत आहे. डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधण्याचे काम हाती घेताच भूतानने त्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच भारताकडे याप्रकरणात मदतही मागितली होती.

भारत, चीन आणि भूतानच्या सीमा जेथे मिळतात तेथे डोकलाम हा प्रदेश आहे. त्या भागावर चीन आपला हक्क सांगत असला तरी सध्या हा प्रदेश भूतानच्या अंतर्गत येतो. डोकलामवरुन चीन आणि भूतानमध्ये वाद असून दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण अजूनही या वादावर तोडगा निघू शकलेला नाही. डोकलाम भूतानमध्ये असल्याने त्याचा  थेट भारताशी संबंध नाही. मात्र भारत आणि भूतान यांच्यात संरक्षण करार झाल्याने भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे.

डोकलाम भागात चिनी सैन्याने सुरू केलेल्या रस्तेबांधणीला भारतीय लष्कराने जोरदार आक्षेप घेतला होता. डोकलामपासून जवळच संपूर्ण ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ ऊर्फ ‘चिकन्स नेक’ हा संवेदनशील टापू आहे. त्यामुळे डोकलामचे संरक्षण हे भारतासाठी महत्त्वाचे मानले जाते.