तेजोमेघ व कृष्णविवरांची टक्करही दिसणार
सौरमालेत एक मोठा धूमकेतू नोव्हेंबर २०१३ मध्ये येत असून तो चंद्रापेक्षा जास्त प्रकाशमान दिसणार आहे, असा दावा खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. या धूमकेतूचे नाव ‘सी-२०१२ एस १’ (आयसॉन) असे असून तो यावर्षी सप्टेंबरमध्ये प्रथम दिसला, असे ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाने म्हटले आहे.येत्या नोव्हेंबर महिन्यात तो सूर्याच्या दिशेने येत असून हार्वर्ड विद्यापीठाच्या मायनॉर प्लॅनेट सेंटरचे टिमोथी स्पार यांच्या मते तो १९९७ मध्ये दिसलेल्या हेल-बॉप धूमकेतूसारखा स्पष्टपणे दिसणार आहे. हेल-बॉप हा धूमकेतू विसाव्या शतकात सर्वाधिक निरीक्षण केला गेलेला धूमकेतू असून तो काही दशकांतील सर्वात प्रकाशमान धूमकेतू आहे. आयसॉन धूमकेतूची ही सूर्यमालेला पहिलीच भेट असून त्यात काही वायू असण्याची शक्यता आहे. सूर्याजवळ येताना ते प्रसरण पावतील. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सौरमालेच्या बाहेर नेमकी कुठली द्रव्ये होती यावर त्याच्या निरीक्षणातून प्रकाश पडेल असे खगोलवैज्ञानिकांना वाटते आहे.आपल्या आकाशगंगेत असलेला पृथ्वीच्या तिप्पट वस्तुमान असलेला वायूमेघही दर्शन देणार असून तो अतिशय मोठय़ा वस्तुमानाच्या कृष्णविवराकडे खेचला जात आहे. त्यांची टक्कर ही नुसत्या डोळ्यांनी दिसणार नसून क्ष-किरण दुर्बिणींच्या मदतीने मात्र या टकरीतून निर्माण होणाऱ्या लहरींचा अभ्यास करता येणार आहे. हा वायूमेघ कृष्णविवराभोवतीच्या उष्ण वायूंमध्ये कोसळेल. ‘धनू-अ’ नावाचे हे कृष्णविवर पंचवीस हजार प्रकाशवर्षे दूर असून त्यात कोसळणाऱ्या तेजोमेघामुळे बरीच माहिती हाती येणार आहे. तीनशे वर्षांपूर्वी हे कृष्णविवर अधिक प्रखर असताना काय घडले होते यावर त्यातून प्रकाश पडणार आहे.