मायक्रोमॅक्सच्या पाहणीतील निष्कर्ष; चिनी बनावटीचे मोबाईल आणि भारतीय मोबाईल यांच्यातील स्पर्धा तीव्र
नवीन वर्षांत टू जी व थ्री जी अशा दोन्ही सेवांना मागणी कायम राहणार आहे. मोठय़ा पडद्याचे मोबाईल घेऊन त्यावर व्हिडिओ पाहण्याचा नवा कल मोबाईल वापरात दिसून येईल, असे मायक्रोमॅक्स या कंपनीने केलेल्या पाहणी अहवालातील अंदाजात म्हटले आहे.
सध्या भारतात मोबाईलचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी कमी किमतीतील मोबाईलला जास्त मागणी राहील कारण अजूनही अनेक ग्राहक किमती मोबाईल विकत घेऊ शकत नाहीत. चिनी बनावटीचे मोबाईल व भारतीय मोबाईल यांच्यातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. जर जीएसटी कर लागू केला तर चिनी कंपन्यांना भारतात प्रवेश करणे अवघड जाणार आहे. मोबाईल इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून वापरणाऱ्यांची संख्या १५ ते २० कोटी होणार आहे. स्मार्टफोनचे सामूहिकीकरण होणार असून स्मार्टफोन प्रथम वापरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. मोबाईलचा वापर प्रादेशिक भाषातून करणे सोपे झाले तर ही संख्या जास्त वाढेल. त्यात किंमत हाही एक मुद्दा असणार आहे. भारतात फोर जी, थ्री जी व टू जी या तीनही सेवा सहअस्तित्वाने राहतील व डिजिटल इंडिया मोहिमेत त्याची मदत होईल. यंदाच्या वर्षी फोर जी सेवेचे लिलाव होत असून त्यामुळेही डिजिटल इंडिया मोहिमेत त्याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी मायक्रोमॅक्स व सॅमसंग यांनी उत्पादन व खपात बाजी मारली होती. २०१६ मध्ये इ कॉमर्स संकेतस्थळे कमी होणार आहेत, कारण त्यांचे आíथक गणित बिघडले आहे व ते आता नवीन शहरात ही सेवा नेतील. २०१६ मध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी मोबाईल हे पसंतीचे साधन राहणार आहे, कारण माहितीचे नेटवर्क व आशय तसेच व्यक्तिकरण व हार्डवेअर हे मुद्दे त्याच जमेच्या बाजूला आहेत. मोबाईल बँकिंग, प्रवास, करमणूक या सेवा महत्त्वाच्याच राहतील कारण स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. सेवांचे सुलभीकरण यामुळे स्मार्टफोनचा खप वाढणार असून त्याच्या जोडीला या सेवांचा विस्तारही होणार आहे.
नववर्षांत मोबाईल सेवेचे भवितव्य.
टूजी, थ्रीजी व फोर जी सेवांचे सहअस्तित्व.
इंटरनेट स्मार्टफोनवर वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ.
मोठय़ा पडदा असलेला स्मार्टफोनचा वापर.
जीएसटी लागू झाल्यास परदेशी कंपन्यांना फटका.