पूर्वाचल एक्स्प्रेसमधील घटना;पक्षाकडून निलंबनाची कारवाई

हावडा-गोरखपूर पूर्वाचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली सिवान येथे भाजपचे विधान परिषद सदस्य टुन्ना पांडे यांना रविवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. १२ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांकडून करण्यात आलेल्या लेखी तक्रारीनंतर टुन्ना पांडे यांना अटक करण्यात आली आहे, असे मुजफ्फरनगरचे रेल्वे पोलीस अधीक्षक बी. एन. झा यांनी माहिती देताना सांगितले. आरोपानंतर टुन्ना यांना भाजपकडून निलंबित करण्यात आले आहे.

हाजीपूर रेल्वे जंक्शनजवळील सराय रेल्वे स्थानकाजवळ पांडे यांनी सकाळी जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास वातानुकूलित कोचमध्ये असलेल्या या मुलीचा लैंगिक छळ केला. तसेच तिला आपल्यासोबत शौचालयात येण्यास सांगितले. या वेळी या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर इतर आसनावर प्रवास करणारे तिचे आई-वडील त्या ठिकाणी पोहोचले, असे तक्रार दाखल करताना मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले.

त्यानंतर विधान परिषद सदस्याला रेल्वेमध्ये असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी अटक केली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे अधीक्षकांनी सांगितले.

पीडित परिवार उत्तर प्रदेशमध्ये हावडय़ावरून गोरखपूरला जात होता, तर पांडे दुर्गापूरवरून हाजीपूरला जाण्यासाठी प्रवास करत होते.

भाजपकडून टुन्ना निलंबित

पांडे यांच्याविरुद्ध जीआरपी हाजीपूरमध्ये या प्रकरणामध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ ए आणि पोस्को कायद्याखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या वेळी मी मोबाइल चार्जर काढण्यासाठी लाईटची कळ चालू केली त्या वेळी सदर मुलीने गोंधळ घातला, असे पांडे यांनी आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे. मात्र करण्यात आलेल्या आरोपांमुळे भाजपने आरोपी विधान परिषद सदस्य टुन्ना यांना निलंबित केले आहे.