* मुख्यमंत्री असताना राज्यात भ्रष्टाचार कमी करण्यात नितीशकुमार अपयशी
* बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांची कबुली
राज्याचे नेतृत्व हाती असताना नितीश कुमार यांना भ्रष्टाचार कमी करण्यात अपयश आल्याचे म्हणत विद्यमान मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी नितीश यांना घरचा आहेर दिला आहे.
इतकेच नव्हे तर, नितीश कुमार मुख्यमंत्री असताना खुद्द जितन राम मांझी यांना आलेल्या वाढीव वीजबीला ऐवजी योग्य बिल आकारणीसाठी संबंधित अधिकाऱयांना लाच द्यावी लागली असल्याची कबुली मांझी यांनी दिली आहे.
बिहारमध्ये नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या गट विकास अधिकाऱयांना संबोधित करताना मांझी म्हणाले की, “नितीश कुमार मुख्यमंत्री असतानाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे झाली यात काही शंका नाही परंतु, भ्रष्टाचार कमी करण्यात त्यांना अपयश आले.”
तसेच “पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिक असावा याची काळजी नितीशकुमार यांनी घेतली पण, अधिकाऱयांच्या खाबूगिरीला लगाम घालण्यात त्यांना अपयश आले. याचे उदाहरण म्हणजे, मला स्वत:ला वाढीव वीजबील आल्याने ते योग्य आकारणीसाठी संबंधित अधिकाऱयांना लाच द्यावी लागली होती.” असेही मांझी यावेळी म्हणाले.