देशभरात रेल्वेच्या तिकिटांप्रमाणेच वीजदरही समान असले पाहिजे अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. एनटीपीसीकडून बिहारला जादा दराने वीज घ्यावी लागत असल्याने नितीशकुमार यांनी ही मागणी केली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणामध्ये १, ४६२ कोटी रुपयांच्या वीज प्रकल्पांचे उद्घाटन केले. रिमोट बटण दाबून त्यांनी वीज प्रकल्पाचे लोकार्पण केले. या कार्यक्रमानंतर नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बिहारमध्ये आम्ही वीज निर्मिती, वीज वितरण या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. आता आमच्यासमोर एकच समस्या आहे. एनटीपीसीकडून बिहारला जादा दराने मिळणारी वीज. आम्ही वीजेसाठी जास्त दर मोजतो’ असे नितीशकुमार यांनी सांगितले. ‘आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला आहे. एनटीपीसीने देशभरात वीजेचे दर समान ठेवावेत’ अशी मागणी त्यांनी केली. ‘देशभरात रेल्वेचे दर समान आहेत. तुम्ही बिहारमध्ये या किंवा महाराष्ट्र, तामिळनाडूत जा, सर्व राज्यांमध्ये रेल्वे तिकिटांचे दर समान आहेत, त्याच धर्तीवर सर्व राज्यांमध्ये समान वीज दर असणे गरजेचे आहे’ असे नितीशकुमार यांनी सांगितले.

बिहारमध्ये आमच्या सरकारच्या काळात सुरु झालेली ‘हर घर बिजली’ ही योजना आता केंद्र सरकारने देशभरात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी बिहारच्या वीज मंडळाचे अभिनंदन करतो. बिहारच्या धोरणाचे आज देशभरात कौतुक होत आहे असे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये वीज वितरण व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. ग्रीड आणि पॉवर सब स्टेशनचे नुतनीकरण करण्यात आले असून यामुळे राज्यातील प्रत्येक भागात वीज पोहोचू शकेल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण व्यवस्थेचा विकास केल्याने आता राज्यातील सर्वसामान्य जनतेला कमी दाबाने वीज पुरवठा होणार नाही असे ते म्हणालेत.