महाआघाडीला सोडचिठ्ठी देणाऱ्या संयुक्त जनता दलाने अखेर भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली असून या बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. जदयूच्या प्रवेशामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

जुलै महिन्यात नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला होता. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या ‘महाआघाडी’तून बाहेर पडण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादेखील दिला. यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपशी युती केल्यानंतर नितीशकुमार एनडीएत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.

शनिवारी बिहारमध्ये संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएत सामील होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता जदयूच्या एनडीए प्रवेशावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले.  काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर जदयूला एनडीएत सामील होण्याचे निमंत्रण दिले होते.

विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी दिल्याने नितीशकुमार नाराज होते. मोदींना विरोध दर्शवत नितीशकुमार यांनी एनडीएला रामराम ठोकला होता. त्यानंतर नितीशकुमार हे कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखले जात होते. बिहारमधील राजकीय परिस्थितीने नितीशकुमार यांची भूमिका बदलली. लालूप्रसाद यादव यांच्यासोबत आघाडी करत नितीशकुमार विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र निवडणुकीनंतर महाआघाडीत मतभेद निर्माण झाले. आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने लालूप्रसाद यादव यांचा सरकारमधील हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळे नितीशकुमार नाराज होते. आता पुन्हा एकदा नितीशकुमार स्वगृही म्हणजे एनडीएत परतले आहेत.