संयुक्त जनता दलातील नाराज नेते शरद यादव यांनी नवीन पक्षाच्या स्थापनेच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नवीन पक्ष स्थापनेचा विचार नाही असे यादव यांनी म्हटले आहे. पण हा दावा करतानाच शरद यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या निर्णयावर त्यांच्याच पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार शरद यादव नाराज आहेत. पक्षाचे अकरा यादव व सात मुस्लिम आमदारांमधूनही विरोधाचे सूर बाहेर पडत असल्याची चर्चा होती. बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला. नितीश कुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शरद यादव यांनी दिली होती. शरद यादव यांचे निकटवर्तीय आणि दोन वेळा बिहार विधान परिषदेचे आमदार राहिलेले विजय वर्मांनी यादव हे महाआघाडीत कायम राहण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करतील असे संकेत दिले होते.

गुरुवारी शरद यादव यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत नवीन पक्ष स्थापनेचे वृत्त फेटाळून लावले. नवीन पक्ष स्थापन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे त्यांनी सांगितले. विजय वर्मा हे माझे जूने सहकारी आहेत, ते भावनेच्या भरात बोलून गेले असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र गुरुवारी राजद नेते मनोज झा यांनी यादव यांची भेट घेतल्याने पुन्हा नवीन चर्चेला सुरुवात झाली. ‘मला शरद यादवांकडून काही विषयांची माहिती हवी होती, म्हणून त्यांच्या घरी आलो’ असे झा यांनी पत्रकारांना सांगितले.