बिहार सरकारने दारिद्रय़रेषेखालील तीन कोटी मुलींना व महिलांना शिक्षण टॅब्लेट्स वाटण्याची महत्त्वाकांक्षी योजना मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणास चालना मिळेल असे राज्य सरकारला वाटते.
माहिती व तंत्रज्ञानमंत्री शाहीद अली खान यांनी सांगितले, की यासाठी ७ हजार कोटींचा योजना आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडला जाईल. अली म्हणाले, की मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्याशी आपली याबाबत चर्चा झाली  असून, अंगणवाडी व वसुधा केंद्रातील मुलींची दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर एक चाचणी घेऊन टॅब्लेट योजनेसाठी निवड केली जाईल.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या सरकारला मुलींना लॅपटॉप वाटप करण्याची योजना मांडली त्यातून, ही योजना मांडण्यात प्रेरणा घेतल्याचा मात्र अली यांनी इन्कार केला. त्यांनी शाळकरी मुलींना लॅपटॉप देण्याची योजना आखली होती. आम्ही आमचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना टॅब्लेट देणार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यांनी विविध क्षेत्रीय विकास कार्यक्रमांतील निधीचा पुरेसा वापर न केल्याचा राजदचा आरोप फेटाळून लावला.