बिहारमधील राजकारण आणि तेथील निवडणुका आजपर्यंत नेहमीच देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आला आहे. बिहारची आगामी विधानसभा निवडणुकही या सगळ्याला अपवाद नसेल. या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी बॉलीवूड आणि भोजपुरीतील संगीत कलाकार मैदानात उतरले आहेत. भोजपुरीतील प्रसिद्ध कलाकार मनोज तिवारी आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली स्नेहा खानवलकर यांच्यात ही जुगलबंदी रंगणार आहे. भाजपचे खासदार असणारे मनोज तिवारी यांनी निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी तयार केलेले ‘इस बार बीजेपी, एक बार बीजेपी’ आणि  ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम स्नेहा खानवलकरने नितीश कुमार यांच्या प्रचारासाठी तयार केलेले स्नेहाचे ‘फिर से नितीश’ ही गाणी चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.
‘इस बार बीजेपी, एक बार बीजेपी’ हे गाणे कार्यकर्त्यांना प्रचंड आवडले असून प्रचाराच्या काळात ते जनतेतही लोकप्रिय होईल, असा विश्वास मनोज तिवारी यांनी व्यक्त केला आहे. या गाण्यात जातीपाती पलीकडे जाऊन विचार करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर बिहारमधील निवडणुका जिंकण्याची अपेक्षा असलेल्या भाजपसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच प्रचाराच्या काळात तब्बल १६० परिवर्तन रथ आणि अन्य ठिकाणी भाजपच्या प्रचारासाठी या गाण्याचा वापर करण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांच्या प्रचारासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या प्रशांत किशोर यांना पाचारण करण्यात आले आहे.  प्रशांत किशोर यांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार स्नेहा खानवलकर हिच्याकडून नितीशकुमारांची महती सांगणारे खास गाणे तयार करून घेतले आहे. स्नेहाने यापूर्वी बिहारमधील परिस्थितीवर आधारित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी संगीत दिले होते. त्या गाण्यांना मिळालेली लोकप्रिय पाहता, नितीश यांच्या प्रचारासाठी तयार केलेले स्नेहाचे ‘फिर से नितीश’ हे गाणे चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.