बिहारमध्ये महाआघाडी तुटल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. तेजस्वी सध्या राज्यभर दौरे करत असून नितीशकुमारांवर टीकेची झोड उठवली आहे. २७ ऑगस्टला राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष महारॅली काढणार आहेत. या रॅलीआधीच पाटण्यात तेजस्वी यादव यांचे ‘बाहुबली’ अवतारातील पोस्टर झळकले आहेत.

लालू प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली लालूप्रसाद यांनी २७ ऑगस्टला ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट आणखी मजबूत करण्यासाठी ही रॅली आयोजित केल्याचे मानले जात आहे. अलिकडेच संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून बाहेर पडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेश केला आहे. नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने विरोधी पक्षांना मोठा हादरा बसला आहे. यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही विरोधकांच्या या महारॅलीत सहभागी होण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपच्या मदतीने संयुक्त जनता दलाने बिहारमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर पक्षाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी बंडखोरी केली आहे. यादव हे सातत्याने नितीशकुमारांवर टीका करत आहेत. तसेच ते जेडीयूच्या बैठकीतही सहभागी झाले नव्हते. लालूप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टला काढण्यात येणाऱ्या महारॅलीत ते सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.