बिहारच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात केंद्राकडून जवळपास ३ लाख ७४ हजार कोटींची मदत केली जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी बिहारच्या भागलपुर येथील जाहीर सभेत केली. बिहारच्या निवडणुकीत विकास हाच मुद्दा असायला हवा या उद्देशाने राज्याच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजची विरोधकांकडून खिल्ली उडवली गेली. पण गेली २५ वर्षे ज्यांनी जातीयवादाचे विष पसरवले त्यांनाही आता माझ्यामुळे पॅकेज घोषित करावे लागले. हेच माझ्या घोषणेचे यश आहे. पण बिहार सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे जनतेची दिशाभुल करणारे आहे. याची पूर्ण कल्पना बिहारच्या जनतेला आहे. बिहारची जनता आता समजुतदार झाली आहे. त्यांनी केवळ विकासाला मतदान करण्याचा निश्चय केला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. तसेच राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी पुढील पाच वर्षांत ३ लाख ७४ हजार कोटींची मदत केंद्राकडून केली जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.
भाजपच्या विरोधकांनी एकवटून आयोजित केलेल्या स्वाभिमान रॅलीवरही त्यांनी तोफ डागली. स्वाभिमान रॅलीत प्रत्येकजण फक्त माझ्यावरच टीका करत होता. उलट, या रॅलीत बिहारच्या भविष्यावर भाष्य होईल असे वाटले होते, पण या सभेतून फक्त निराशाच हाती आली, या सभेत बिहारला पुढे नेण्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. त्यामुळे या रॅलीला काहीच अर्थ नाही, असे मोदी म्हणाले. तसेच ज्यांनी जयप्रकाश नारायण यांचे बोट धरुन राजकारणात प्रवेश केला त्यांनी आता जयप्रकाश नारायण यांना तिलांजली दिली आहे. त्यामुळे महाआघाडीची स्वाभिमान रॅली ही राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण या महान पुरुषांना तिलांजली देणारी सभा होती, असा घणाघात यावेळी मोदींनी केला. महापुरुषांना तिलांजली देणाऱयांना आता जनतेच तिलांजली द्यावी, असे आवाहनही मोदींनी बिहारच्या जनतेला केले.
सत्तेच्या नशेत बुडालेले लोक आता बिहारमधील अभ्यासू मतदारांना गृहीत धरू शकत नाहीत, असे सांगत मोदींनी नितीश यांच्यावर निशाणा साधला. तसेच बिहारमध्ये २००५ साली १०१ आरोग्य केंद्रे होती, मात्र २०१५ सालामध्ये त्यात घट होऊन ती ७० झाली, यावरून बिहार सरकारला लोकांच्या आरोग्याची, प्रकृतीची किती काळजी आहे ते दिसून येते, असा टोलाही मोदींनी लगावला.
सत्तेत आल्यापासून १४ महिन्यांनंतर बिहारच्या जनतेची आठवण झाल्याचा विरोधकांचा आरोप देखील मोदींनी फेटाळून लावला. मी ज्यांना विसरलोच नाही, त्यांची आत्ता आठवण येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही? राज्यातील जनतेला मी नव्हे तर सत्तेत मश्गुल झालेले अन्य नेते विसरले आहेत. सत्तेच्या धुंदीत त्यांना इतर काहीच लक्षात नाही, असे प्रत्युत्तर मोदींनी दिले. माझी बांधिलकी बिहारमधील लोकांशी आहे, त्यामुळे मी त्यांना स्पष्टीकरण देईन. नेपाळला भूकंपाचा धक्का बसल्यावर बिहारमध्येही त्याचा परिणाम जाणवेल हे माझ्या लक्षात आले आणि आम्ही तात्काळ बिहारच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून चौकशी केली, मात्र तेव्हा ते दिल्लीत होते. त्यामुळे राज्य सरकारच्या आधी मी बिहारच्या जनतेला मदत केली, असेही मोदी पुढे म्हणाले.