बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका महिला अभियंत्याला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या घरमालकासह पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर येथे राहणा-या ४२ वर्षीय सरिता देवी या मनरेगा योजनेसाठी कनिष्ठ अभियंत्या म्हणून कार्यरत होत्या. सरिता देवी यांना दोन मुलं असून पतीशी वाद असल्याने त्या अहियापूर येथे राहत होत्या. गेल्या १० वर्षांपासून सरिता देवी आणि त्यांचे पती विभक्त राहत आहेत. सरिता देवी यांचा लहान मुलगाही त्यांच्यासोबतच राहतो.  पण सरिता देवी यांनी दोन दिवसांपूर्वीच लहान मुलगा आर्यन याला गावातच राहणा-या आईच्या घरी पाठवले होते. तर त्याचा मोठा मुलगा सीतामढी येथे वडिलांसोबत राहतो. सोमवारी पहाटे सरिता देवी यांच्या घरातून धूर येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता घरात जळून खाक झालेल्या मृतदेहाची राख होती. मात्र मृतदेहाजवळील चपलेवरुन हा मृतदेह सरिता देवी यांचा असल्याचे समोर आले. सरिता देवी यांची आई गावातच राहत असून त्यांनीच चपलेवरुन सरिता देवी यांची ओळख पटवली आहे.

सरिता देवी यांच्या घरात सुसाईड नोट आढळली आहे.  यामध्ये माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नका असे म्हटले आहे. मात्र ज्या स्थितीत मृतदेहाची राख आढळली ते बघून ही आत्महत्या नसून हत्या असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी चौकशीसाठी सरिता देवी यांचे पती आणि घराचे मालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. मृतदेह जाळल्याचा वास येऊ नये म्हणून केमिकलचा वापर करण्यात आला असे पोलिसांनी म्हटले आहे. सरिता देवी या विजय गुप्ता यांच्या घरात भाड्याने राहत होता. विजय गुप्ता प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार करण्यातही त्यांना मदत करत होता असे स्थानिकांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.