काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहे. राजस्थानमध्ये जमीन वाटपाशी निगडीत १८ प्रकरणांमध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या १८ प्रकरणांमध्ये रॉबर्ट वढेरा यांच्या जमिनीचाही समावेश आहे.

राजस्थानमधील वसुंधरा सरकारने जमीन घोटाळ्याशी निगडीत १८ प्रकरणांचा जपास सीबीआयकडे सोपवला होता. बिकानेरमध्ये २७० एकर जमिनीचे चुकीच्या पद्धतीने वाटप केल्याचे प्रकरण आहे. या जमिनीचा हिस्सा वढेरा यांच्या कंपनीने खरेदी केला होता. दरम्यान, काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणात वसुंधरा सरकारवर हल्ला करत हा राजकीय द्वेषातून आरोप केला जात असल्याची टीका केली होती.

इडीने केली कारवाई
याचवर्षी एप्रिल महिन्यात बिकानेर जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) रॉबर्ट वढेरा यांच्या निकटवर्तींयावर छापे टाकले होते. एनडीटीव्ही इंडियाच्या वृत्तानुसार, इडीने फरिदाबादमध्ये तीन जागांवर छोप टाकले होते. ज्या लोकांच्या घरी छापे टाकण्यात आले त्यामध्ये रॉबर्ट वढेरा यांचे निकटवर्तीय महेश नागर आणि अशोक कुमार यांचा समावेश आहे. बिकानेरमध्ये २७० एकर जमीन ७९ लाख रूपयांत खरेदी केली आणि तीन वर्षांनंतर तीच जमीन ५ कोटी रूपयांत विकण्यात आली. यामुळेच इडीने छापे टाकले होते.