काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांच्या वक्तव्याचा इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) खरपूस समाचार घेतला असून बिलावल हे पाकिस्तानातील दिवास्वप्ने पाहणारे नेते आहेत, अशी टीका केली आहे. काश्मीरच्या इंच-इंच भागाचे शेवटच्या मिनिटापर्यंत रक्षण केले जाईल, असे लीगने म्हटले आहे.
पाकिस्तानातील विरोधी पक्षनेते असलेल्या बिलावल भुत्तो यांनी जी बडबड केली आहे त्यावरून ते पाकिस्तानातील दिवास्वप्न पाहणारे एक नेते आहेत हेच स्पष्ट होते, असे आययूएमएलचे खासदार इ अहमद यांनी सांगितले.
 ते म्हणाले, की जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग आहे. भारतातील १७ कोटी मुस्लिमांसह सगळा भारत काश्मीरचे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्षण करील.
बिलावल यांनी दिवास्वप्ने बघण्यापेक्षा त्यांच्या देशाच्या हितासाठी काहीतरी करावे. भारतातील मुस्लीम मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे व काश्मीरचे रक्षण करण्यास सज्ज आहेत, असे अहमद यांनी सांगितले.
पाकिस्तानातील पुढच्या पिढीचे नेते मानले जाणारे बिलावल भुत्तो २०१८ मध्ये निवडणूक लढवणार आहेत व त्यांना भारताशी चांगले संबंध हवे आहेत, असे असताना त्यांनी शुक्रवारी पंजाबमधील मुल्तान येथे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना काश्मीर आपण भारताकडून परत मिळवू अशी वल्गना केली.