मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदाच्या शतकातील त्यांचे सर्वात मोठे दान केले आहे. गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या मालकीचे शेअर्स दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य गेट्स यांच्या एकूण संपत्तीच्या ५ टक्के इतके आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टचे ६ कोटी ४० लाख शेअर्स गेट्स यांनी दान केले आहेत. या शेअर्सचे मूल्य ४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २९ हजार ५७१ कोटी रुपये इतके आहे. सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशनने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली.

बिल गेट्स यांनी तब्बल २९ हजार ५७१ कोटी रुपयांचे दान नेमके कोणाला दिले, याबद्दलची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र यातील बहुतांश दान त्यांनी त्यांच्या बिल आणि मेलिंडा फाऊंडेशनला दिल्याचे समजते. गेट्स दाम्पत्याने समाजकार्यासाठी या संस्थेची स्थापना केली होती. २००० सालानंतर प्रथमच बिल गेट्स यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दान केले आहे. त्याआधी १९९९ मध्ये गेट्स यांनी १६ अब्ज डॉलरचे दान केले होते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम १ लाख कोटी रुपये इतकी होते. १९९९ मध्येही त्यांनी शेअर्सच्या स्वरुपातच दान केले होते. १९९९ नंतर २००० साली गेट्स यांनी ५.१ अब्ज डॉलर्सचे म्हणजेच ३२ हजार ७८० कोटी रुपयांचे दान केले होते.

गेट्स फाऊंडेशनची कर परताव्याची कागदपत्रे आणि वार्षिक अहवाल यांच्यामधील माहितीनुसार १९९४ पासून संस्थेला शेअर्स आणि रोख रकमेच्या स्वरुपात दान मिळते आहे. या संस्थेला बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्याकडून आतापर्यंत ३५ अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल २.२४ लाख कोटी रुपये इतके दान मिळाले आहे. वॉरेन बफेट यांच्यासोबत गेट्स यांनी २०१० मध्ये ‘गिव्हिंग प्लेज’ची स्थापना केली. तेव्हापासून १६८ धनाढ्य लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या दानशूर व्यक्तींनी स्वत:च्या संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा समाजकार्यासाठी देण्याची शपथ घेतली आहे.