पृथ्वीवरील सर्वात जुने पाणी ओंटारिओ येथील टिमिन्स खाणीत सापडले असून ते १.५ अब्ज वर्षांंपूर्वीचे आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवरील जीवसृष्टी व मंगळाच्या अभ्यासासाठी होणार आहे.
लँकेस्टर विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे डॉ. ग्रेग हॉलंड यांनी मॅंचेस्टर विद्यापीठ व दोन कॅनेडियन विद्यापीठाच्या संशोधकांसह हा पाण्याचा साठा सापडला आहे. जगापासून हा पाण्याचा साठा दूर आहे. १.५ अब्ज वर्षे तेथे पाणी आहे. स्फटिकांच्या स्वरूपातील खडकांमधून हे पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अर्धा मैल खोलीवर मिळाले आहे. या पाण्याचे विश्लेषण डेटिंग तंत्रज्ञानाने केले असता त्यात झेनॉनसारखा निष्क्रिया वायू व इतर घटक सापडले आहेत. झेनॉन समस्थानिके ही एखादा द्रव पृथ्वीच्या संपर्कात कधीपासून आहे हे शोधण्यासाठी वापरले जातात. या पद्धतीनुसार हे पाणी १.५ अब्ज वर्षांपूर्वीचे असून यापूर्वीचे जुने पाणी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत सापडले होते, त्याच्यापेक्षाही आताचे पाणी लाखो वर्षे जुने  आहे.

काय आहे पाण्यात..
आता सापडलेल्या सर्वात जुन्या पाण्यात काही सूक्ष्म जीव असून ते हायड्रोजन व मिथेन यांच्यापासूनच्या ऊर्जेवर सूर्यप्रकाशाशिवाय जगले आहेत. या पाण्याच्या नमुन्यांचे परीक्षण केले जात आहे.

‘आमच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व पर्यावरणस्नेही पद्धतीने सूक्ष्मजीवांचे रक्षण कसे करता येईल यावर नवा प्रकाश पडू शकेल. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे सूक्ष्मजीव जगू शकले आहेत व मंगळावरही प्रतिकूल परिस्थितीत असे सूक्ष्मजीव जगलेले असू शकतात.’
    डॉ. ग्रेग हॉलंड