ग्रामीण भागातील सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर व्हावे या हेतूने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कार्यालयामध्ये ‘बायोमेट्रिक अटेंडंस मशीन’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक फलकावर लिहून ठेवणे अनिवार्य केले जाणार आहे. सध्या ग्राम पंचायतीच्या हातामध्ये कुठली कामे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती लिहून ठेवणे अनिवार्य केले जाणार आहे.

आज ग्रामविकास खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आदित्यनाथ यांची बैठक झाली. पंतप्रधान गृह योजनेची उद्दिष्टे वेळेवर गाठा असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांना वेळेवर हजर व्हावे लागेल आणि कामातील गती वाढवावी लागेल असे त्यांनी बजावले. राज्यामध्ये ५.७३ लाख लोकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत. जे लोक घरांसाठी पात्र आहेत त्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करुन द्यावीत असे त्यांनी म्हटले आहे.

रोजगार हमी योजनेतील लाभधारकांची नावे आधार कार्डासोबत जोडण्यात यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, वर्ल्ड बॅंकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली नीर निर्मल योजना, राज्य ग्रामीण पेयजल योजनांचे काम कसे सुरू आहे याबाबतची चौकशी त्यांनी यावेळी केली. राज्यातील विविध भागात पेयजल पुरवठ्याची कामे कुठपर्यंत आली आहे अशी विचारणा त्यांनी केली.

बुंदेलखंडचा अपवाद वगळता सर्व राज्यामध्ये पाइपलाइन द्वारे पाणी पुरवठा केला जावा असे त्यांनी म्हटले. बुंदेलखंडमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. त्या ठिकाणी हातपंप आणि बोरिंगची कामे सुरू करण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले आहेत. हातपंपांची दुरुस्ती किंवा नव्याने बसवण्याची कामे तसेच बोरिंगची कामे ही आमदार निधीतूनच झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कामांसाठी वेगळा खर्च केला जाणार नाही असे देखील त्यांनी म्हटले.