राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार अद्याप धर्मातराच्या मुद्दय़ावर टीकेचे लक्ष्य ठरले असतानाच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देशात धर्मातरविरोधी कायदा करण्याची मागणी केली. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी या कायद्यास पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अमित शहा सध्या दक्षिण मोहिमेवर असून त्यांनी सांगितले की, भाजप हा सक्तीच्या धर्मातराला विरोध करणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. धर्मातरबंदी कायद्याला धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आमचे मत आहे.
केरळचा दौरा आटोपताना त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, पक्षाचे संघटन हे २०१५च्या स्थानिक संस्था निवडणुका व २०१६च्या विधानसभा निवडणुकांना तोंड देण्यास सज्ज असले पाहिजे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण येथे आलो होतो.
धर्मातराच्या मुद्दय़ावर अल्पसंख्याकांशी बोलणार आहात का, असे विचारले असता ते म्हणाले की, देशात असा कायदा आणला तर तो मतैक्याने आणला जाईल.
उत्तर प्रदेशातील घरवापसी म्हणजे धर्मातर कार्यक्रमाबाबत शहा यांनी सांगितले की, हे प्रकरण न्यायाप्रविष्ट आहे. त्यामुळे आपण त्यावर भाष्य करणार नाही.एनडीएचे भाजपप्रणीत सरकार जातीय आधारावर समाजात दुही माजवत आहे हा आरोप फेटाळताना ते म्हणाले, देशात असे काही होत आहे असे आपल्याला वाटत नाही.
आधार कार्ड व काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर भाजपने कोलांटउडी मारल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, आमचे सरकार काळा पैसा परदेशातून परत आणण्यास वचनबद्ध आहे. भाजप आधार कार्डाच्या कधीच पूर्ण विरोधात नव्हते. त्यात केवळ काही बदल करावेत असे आमचे म्हणणे होते. भाजप सरकार आल्यानंतर आम्ही काळा पैसा शोधण्यासाठी प्रथमच एसआयटी नेमली. परदेशांशी चर्चा करून काळा पैसा परत आणण्यासाठी सुलभ स्थिती निर्माण केली.