कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी मोदींची सप्तसूत्री; सभेत सपवर टीकास्त्र

उत्तर प्रदेशातील कैरना येथील हिंदूंच्या स्थलांतराचा मुद्दा हाती घेण्याचे संकेत भाजपने येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिले.  बैठकीच्या समारोपानंतरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडले. मात्र त्यांनी कार्यकारिणीच्या समारोपावेळीच्या भाषणात वादग्रस्त मुद्दय़ांवर बोलणे टाळले. पक्ष कार्यकर्त्यांना सप्तसूत्री देत सत्तेचा वापर समाजाच्या भल्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत अपेक्षेप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. पक्षाध्यक्ष अमित शहा व इतर नेत्यांनी कैरनाच्या मुद्दय़ाचा उल्लेख केला.  कार्यकारिणीच्या समारोपावेळी भाषणात पंतप्रधानांनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख करत, महाराजांनी सत्तेचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केला, त्यांचे आदर्शवत वर्तन होते. मात्र काही जण हाती सत्ता नसतानादेखील सूत्रे हातात ठेवून लाभ उठवतात असा टोला गांधी कुटुंबीयांना पंतप्रधानांनी लगावला. आसाममधील विजय तसेच केरळ व पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यातून सत्तेचे दुर्गुण आपल्याला चिकटता कामा नयेत असा इशारा पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना दिला.

मोदींची सप, बसपवर टीका

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष जातीयवाद, गुंडगिरी आणि नाकर्तेपणाने ग्रासला असून बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष आलटूनपालटून सत्ता उपभोगण्याच्या भ्रष्ट राजकारणात गुंतले असल्याची टीका मोदी यांनी येथील सभेत केली.

कार्यकर्त्यांसाठी सप्तसूत्री

भाजप कार्यकर्त्यांनी सात सूत्रे आचरणात आणावीत असे आवाहन मोदींनी केले. त्यात सेवाभाव, संतुलन, समन्वय, संयम, सकारात्मक, सद्भावना व संवाद या सात बाबींचे प्रतिबिंब व्यवहारात व धोरणात पडले पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी स्पष्टकेले.

देश बळकट करण्याची गरज आहे. केवळ घोषणांनी जनतेचे समाधान होत नाही. देश कसा बळकट होईल याची सामान्यांना चिंता असते.

– नरेंद्र मोदी