भूसंपादन विधेयकाबाबत केंद्र सरकारवर जोमाने हल्ला चढवत असलेल्या काँग्रेसवर भाजपने आज आक्रमक होऊन प्रतिहल्ला चढवला. विकास आणि भूसंपादनाचे ‘वड्रा मॉडेल’ काय ते समजावून सांगावे, तसेच या सरकारला दिलेल्या जनादेशाचा ‘अपमान’ केल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकांची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.
नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा निर्लज्जपणे अपमान केल्याबद्दल भाजपने राहुल गांधी यांचा निषेध केला.रामलीला मैदानावर ‘किसान रॅली’मध्ये काँग्रेसला ‘रि-लाँच’ करण्याबाबत पक्षाने त्यांची खिल्ली उडवली. राहुल  हे भूसंपादन विधेयकाबाबत खोटे’ बोलत आहेत, तसेच बडय़ा कंपन्यांसाठी किंवा खाजगी उद्योगांसाठी भूसंपादन करताना २०१३ सालचे संपूर्ण विधेयक लागू राहील हे सरकारने स्पष्ट केले असतानाही ते या संदर्भात अपप्रचार मोहीम राबवत आहेत, असा आरोप भाजपने केला. विकास आणि भूसंपादन याबाबत ‘वड्रा मॉडेल’ काय आहे हे आम्ही नम्रपणे विचारू इच्छितो. गरीब शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन गांधी घराण्याशी संबंधित एका व्यक्तीचा फायदा करून देण्यासाठी राज्याची संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्यात आली, तसेच कायदे धाब्यावर बसवण्यात आले, अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली