दिल्लीत भाजपला मिळालेला विजय म्हणजे जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या तीन वर्षातील कारभाराला दिलेली पसंतीची पोचपावती आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. दिल्लीतील महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमित शहा यांनी म्हटले की, गेल्या तीन वर्षांपासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप विजयी घौडदौड करत आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश , उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीतही भाजपला विजय मिळाला होता. त्यानंतर आज दिल्लीच्या जनतेनेही भाजपच्या बाजूने स्पष्टपणे कौल दिला आहे. ही एकप्रकारे नरेंद्र मोदी यांच्या गेल्या तीन वर्षातील कारभाराला जनतेने दिलेली पसंतीची पोचपावती असल्याचे शहा यांनी म्हटले. यानिमित्ताने दिल्लीच्या जनतेने यापुढे नकारात्मक आणि नाटकी राजकारण खपवून घेतले जाणार नाही, हा संदेश दिला आहे. दिल्लीकरांनी भाजपच्या सकारात्मक, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या आणि विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचेही अमित शहा यांनी म्हटले.

दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मतमोजणीच्या सुरूवातीच्या टप्प्यापासूनच भाजपने मोठी आघाडी घेतली. उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली यापैकी एकाही महानगरपालिकेत भाजपला काँग्रेस किंवा आप कडवी टक्कर देऊ शकलेले नाहीत. या तिन्ही महानगरपालिकांच्या एकूण २७० जागांपैकी १८० जागांवर भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस आणि आप यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे. काँग्रेस ३५, आप ४५ आणि इतर पक्ष १० जागांवर आघाडीवर आहेत.