काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुरहान वाणीसंदर्भात केलेले विधान चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील चकमकीच्या वेळी बुरहान वाणी त्या ठिकाणी होता, ही माहिती सुरक्षा यंत्रणेला नव्हती, अशी प्रतिक्रिया मेहबूबा यांनी दिली होती. यावर काश्मीरमधील भाजपचे प्रमुख सत शर्मा यांनी मुफ्ती यांच्या विधानाला विरोध दर्शविणारे विधान केले आहे. काश्मीरमधील दहशतवादी विरोधातील कारवाई करत असताना बुरहान वाणी त्या ठिकाणी असल्याची सुरक्षा यंत्रणेला कल्पना होती, असे  त्यांनी म्हटले आहे. बुरहान वाणीची माहिती मिळाल्यानंतरच लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई फत्ते केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांनी देशाचे विभाजन करण्याच्या उद्देशाने हत्यारे उचलली आहेत, त्यांच्या विरोधातील कारवाईचे शर्मा यांनी समर्थन केले. यावेळी वानी याच्यावर दहा लाखाचे बक्षिस असल्याची माहिती देत लष्कराने  केलेल्या कारवाईची शर्मा यांनी स्तुती देखील केली. बुरहान या ठिकाणी असल्याची माहिती यंत्रणेला असती, तर सुरक्षा यंत्रणेने ही कारवाई वेगळ्या पद्धतीने हाताळली असती, असे मेहबूबा यांनी  म्हटले होते. विशेष, म्हणजे काश्मीरमध्ये सध्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती आणि भाजपचे एकत्रित सरकार आहे. काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी याला मारल्यानंतर काश्मीर खो-यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.