लांबलेल्या पक्षप्रवेशामागचे कारण स्पष्ट; अंतिम निर्णय दिल्लीतच

‘‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याबद्दल काही अडचण नाही. पण त्यांची दोन्ही मुले उपद्व्यापी आहेत. त्यांचे असले वागणे भाजपमध्ये चालणार नाही..,’’ अशी स्पष्ट टिप्पणी करीत भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने राणेंच्या भाजपप्रवेशाची वाट बिकट असल्याचे सूचित केले.

‘‘राणे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची उपयुक्तता नक्कीच आहे. पण त्यांच्याबरोबर त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षामध्ये घ्यावे लागेल. एकावर दोन मोफत घेण्यासारखा प्रकार आहे. त्या दोन्ही मुलांचे प्रताप पाहता, ते आमच्या पक्षामध्ये कितपत फिट्ट बसतील सांगता येत नाही. त्यांचे (हिंसक) वागणे पक्षाला मान्य होण्यासारखे नाही. त्यामुळे राणेंचा भाजपप्रवेश रखडला आहे. पक्षात दोन मतप्रवाह आहेत,’’ असे त्या नेत्याने सांगितले. मात्र, राणेंबद्दलचा निर्णय अंतिमत: दिल्लीतच आणि तोही सर्वोच्च पातळीवरच होण्याची पुस्ती त्याने जोडली.

काँग्रेसवर तीव्र नाराज असलेले राणे हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा खूप महिन्यांपासून आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष अमित शहांची अहमदाबादमध्ये घेतलेल्या कथित भेटीवरून वादळ उठले होते. पण सर्वानीच इन्कार केला तरी राणेंच्या भाजपप्रवेशाची चर्चा थांबलेली नाही. भाजपच्या पिंपरीमधील राज्य कार्यकारिणी बैठकीत प्रवेश करणार असल्याचे ठामपणे सांगितले जात होते, पण त्यांच्या कथित प्रवेशाचा मुहूर्त दरवेळी लांबणीवर पडताना दिसतो आहे. त्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या या केंद्रीय नेत्याने राणेंच्या प्रवेशामधील अडचण मोकळेपणाने सांगितली.

नितेश आणि नीलेश ही राणेंच्या चिरंजीवांची नावे आहेत. नितेश हे कणकवलीचे आमदार, तर नीलेश हे माजी खासदार आहेत. गोव्यातील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण, नारायण राणेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक राजन तेली यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला, जागा बळकाविण्यासाठी खंडणी असे नितेश यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. नुकताच त्यांनी मच्छीमारांच्या मागण्यांसाठी मच्छीमार आयुक्तांवर मासे फेकण्याचा प्रकार केला होता. पुण्यातील संभाजी बागेतील थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा फेकून देण्यामागे त्यांचा हात असल्याचा आरोप केला जातो. दुसरे चिरंजीव नीलेश यांच्यावरही काही गुन्हे आहेत. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयाची मोडतोड, काँग्रेस कार्यकर्ता संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणाचा आरोप त्यांच्यावर आहे. मराठा मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना फटकाविण्याची भाषा त्यांनी मध्यंतरी केली होती.