दिल्ली सरकारविरोधात भाजप, काँग्रेसची निदर्शने

दिल्लीतील वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरळीत सुरू करावा या मागणीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.

भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. दिल्लीत वीज आणि पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली असतानाही केजरीवाल गोवा आणि पंजाबमध्ये आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मश्गूल असल्याचा आरोप दिल्ली भाजपचे प्रमुख सतीश उपाध्याय यांनी केला.

शहरातील विजेच्या आणि पाण्याच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. मुख्यमंत्री गोवा दौऱ्यावर आहेत, तर पाण्याची जबाबदारी असलेले मंत्री पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अनेक भागांत पाण्याचा तुटवडा आहे, तर काही भागांत तीन तास वीज गायब असते आणि त्याचा पाणीपुरवठय़ावर परिणाम होतो, या सरकारकडे द्रष्टेपणा आणि प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.

भाजपच्या निदर्शनांनंतर दिल्ली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. हातात फलक धरून महिलांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. वीज आणि पाणी दोन दिवस मिळत नाही त्याची मुख्यमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे, असे या महिला म्हणाल्या.