नेहरूंपासून ते मनमोहन सिंग सरकारच्या काळातील घोटाळयांवर भाजपचे बोट

पंडित नेहरू ते डॉ. मनमोहनसिंग या काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात घोटाळे उघडकीस आले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही, असा दावा करीत भाजपने भ्रष्टाचारमुक्त सरकार यावरच भर दिला आहे.

मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते. पक्षाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंहराव यांनी गेल्या तीन वर्षांतील मोदी सरकारच्या काळातील महत्त्वाचे निर्णय यावर सादरीकरण केले. तीन वर्षांत सरकारच्या काळात झालेल्या सर्व निर्णयांचे सारे श्रेय केवळ मोदी यांनाच देण्यात आले. संबंधित मंत्र्यांचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. सामाजिक क्षेत्रात पक्षाने केलेल्या विविध योजनांची जंत्री सादर करण्यात आली.

मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचार, काळा पैसा याला आळा बसला यावरच मुख्यत्वे पक्षाच्या वतीने भर देण्यात आला. मग नेहरू सरकारच्या काळातील जीप खरेदी घोटाळ्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची मालिका सादर करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात तर कोळसा खाणी वाटप, २ जी घोटाळा यांनी भ्रष्टाचाराचा कळसच गाठल्यावरही भाजपने भर दिला.

यूपीए सरकारच्या काळात कोळसा खाणींच्या वाटपात साराच घोळ आणि गोंधळ झाला, पण मोदी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कोळसा खाणींच्या वाटपातून सरकारच्या तिजोरीत चांगली भर पडल्याचे सांगण्यात आले. मोदी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात काळा पैसेवाले मस्तवाल झाले होते. पण मोदी सरकारच्या काळात मात्र काळा पैसेवाले घाबरले आहेत, असा दावा करण्यात आला. काँग्रेस सरकारच्या काळात झालेले घोटाळे किंवा गैरव्यवहारांचा उल्लेख करण्यात आला असला तरी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पेट्रोलपंप वाटप, शवपेटय़ा यावरून आरोप झाले होते.

निश्चलनीकरण, नवीन भारत, लोकांचे जीवनमान उंचावणे, वस्तू आणि सेवा करप्रणाली, विदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, कृषी क्षेत्राला देण्यात आलेले प्राधान्य आदी क्षेत्रांमध्ये सरकारला यश आले किंवा घेतलेले निर्णय उपयुक्त ठरले, असा दावाही करण्यात आला. पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या संवादाचे आयोजन पक्षाचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी यांनी केले होते.

राष्ट्रपती भाजपचाच – अमित शहा

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतांच्या ५४ टक्क्य़ांपेक्षा जास्त मते भाजपच्या बाजूने असल्याने भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. विरोधकांनी भाजपचा उमेदवार मान्य केल्यास निवडणूक सहमतीने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डाव्यांची सत्ता असलेल्या त्रिपूरा आणि बिजू जनता दलाची सत्ता असलेल्या ओडिसात आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळेल, असा दावाही शहा यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची राजकीय परिस्थिती सुधारली आहे. ममता बँनर्जी यांना पर्याय म्हणून भाजपच पुढे येईल. ईशान्येकडील अन्य राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, असा दावाही शहा यांनी केला.