भाजपच्या दलित खासदारांचे सरकारला आवाहन; दलितांवरील हल्ले देशासाठी कलंक

गोरक्षेच्या नावाखाली तथाकथित गोरक्षकांकडून दलितांवर होणारे हल्ले आणि अत्याचार हे मानवतेला काळिमा फासणारे तर आहेतच शिवाय देश आणि समाजासाठीही ते कलंक आहेत. तेव्हा या हल्लेखोरांना आवरा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आवाहन भाजपच्या दलित खासदारांनी पक्ष आणि केंद्र सरकारला केले आहे. हल्ल्याच्या या घटनांना वेळीच पायबंद घातला नाही तर पंतप्रधानांच्या विकासाच्या राजकारणाला ग्रहण लागेल, असा इशाराही या खासदारांनी दिला.

गुजरात  व मध्य प्रदेशात तथाकथित गोरक्षकांनी दलित व मुस्लिम महिलांवर हल्ले केले होते. याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही दलितांवरील हल्ल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपच्या दलित खासदारांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना या हल्ल्यांचे वर्णन गुंडगिरी आणि मानवतेला कळिमा फासणारे असे केले.

कोण काय म्हणाले..

  • मोहनसिंह, नगिना (उत्तर प्रदेश) : मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे हा दलितांचा पूर्वापार व्यवसाय आहे. आणि या समाजानेच त्यांना तो बहाल केला आहे. त्यामुळे दलितांवर गोरक्षेच्या नावाखाली हल्ले होणे हे सर्वथा गैर आहे. तुम्हाला गोरक्षाच करायची असेल तर गायीला सकस आहार कसा मिळेल, तिची वाढ कशी होईल, याची काळजी गोरक्षकांनी घ्यायला हवी. सरकारनेही समाजात तेढ निर्माण होणार नाही, असे वातावरण निर्माण करायला हवे.
  • कौशल किशोर, मोहनलालगंज (उत्तर प्रदेश) : गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. या राज्यांच्या सरकारांनी या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच हल्ले करणारे खरोखरच गोरक्षक आहेत काय, याचीही शहानिशा करून घेणे आवश्यक आहे.
  • अशोककुमार दोहरी, इटावा (उत्तर प्रदेश) : दलित आणि अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे देश व समाजासाठी घातक आहे. काहीही चुकीचे घडले तरी लगेच कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. कायद्याचा तसा धाक हवाच. कदाचित यामागे मोदी सरकारला बदनाम करण्याचे कारस्थानही असू शकते. पंतप्रधानांना निष्प्रभ करण्याचा हा कट देशासाठी धोकादायक आहे. घटनाविरोधी ही कृत्ये आहेत.
  • कमलेश पासवान, बन्सगांव : भाजपमध्ये द्वेषाच्या या राजकारणाला कधीच स्थान नव्हते. मानवी जीवन हे सुंदर आहे. त्याचे रक्षण झालेच पाहिजे. पक्षनेतृत्व नक्कीच या घटनांची गंभीर दखल घेऊन दोषींना कठोर शासन करेल.
  • छेदी पासवान, सासाराम (बिहार) : हल्ल्याच्या या घटना काही नवीन नाहीत. या देशात दगडाला देव मानले जाते. कुत्र्याला निष्ठावान समजले जाते. मात्र, माणसे माणसांना हीन दर्जाची वागणूक देते. हे सर्व उद्विग्न करणारे आहे.
  • विनोदकुमार सोनकर, कौसंबी : आपले पंतप्रधान एकीकडे विकासाच्या आणि सामाजिक सलोख्याची भूमिका घेतात. मात्र असे प्रकार घडणे हे पंतप्रधानांच्या भूमिकेला छेद देणारे असून देशासाठी दुर्दैवी आहे.