कँन्टोन्मेंट निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत भाजपला मोठा फटका बसला आहे. वाराणसीत भाजपच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, महाराष्ट्रात मात्र मोदीलाट अजूनही कायम आहे. पुणे आणि नाशिकमध्ये भाजपने बहुमताने सत्ता हस्तगत केली आहे.
लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदार संघातून बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपला कन्टोन्मेंट निवडणुकीत ७ जागांपैकी एकाही जागेवर यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे खुद्द मोदींच्या मतदार संघातच भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे, या सातही जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर, महाराष्ट्रात पुणे कँन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत ५ जागांवर भाजपला यश मिळाले आहे. तसेच देहूरोड कँन्टोन्मेंटमध्ये देखील भाजपने ४ जागा पटकावल्या आहेत. परंतु, खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला गड राखला. खडकीमध्ये काँग्रेसने ५ जागांवर विजय प्राप्त केला आहे.
नाशिकमध्ये भाजपची सरशी झाली. नाशिक कँन्टोन्मेंट निवडणुकीत एकूण ८ जागांपैकी ५ जागांवर भाजपने विजय साजरा केला आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात कँन्टोन्मेंट निवडणुकीत मोदीलाट अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. तर, वाराणसीतील पराभव भाजपसाठी धक्का ठरला आहे.