विजयांच्या हॅटट्रिकसह गुजरात खिशात घालणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दिल्लीत जंगी स्वागत झाले. फटाके वाजवून, मिठाई वाटून उत्स्फूर्त घोषणा आणि ढोलताशांच्या दणदणाटात भाजप मुख्यालयात स्वागत होत असताना मोदी भलतेच विनम्र झाले होते. ‘कठोर परिश्रमांना विकल्प नसतो,’ असा ‘सहकारी’ कार्यकर्त्यांना संदेश देत सांगताना ११, अशोक रोडवरील वास्तव्याच्या आठवणींनी मोदी भूतकाळात शिरले.
राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत आलेल्या मोदींचा दिल्ली प्रदेश भाजपने अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. त्यांचे आगमन होण्यापूर्वीच भाजपचे मुख्यालय असलेला अशोक रोड भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे बंद पडला होता. मोदींचे आगमन होण्यापूर्वी भाजप मुख्यालयाबाहेर दोन तासांपासून फटाके आणि ढोलताशे वाजविले जात होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांच्या भेटी घेऊन मोदी तासभर उशिराने भाजप मुख्यालयात दाखल झाले. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.  
भाजप मुख्यालयातील प्रांगणात मोदींचे हार घालून तसेच त्यांना स्वामी विवेकानंदाची तसबीर देऊन अभिनंदन करताना गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली. भाजप मुख्यालयातील छोटय़ाशा खोलीत आयुष्याची महत्त्वपूर्ण वर्षे पक्षकार्यासाठी व्यतित करताना आपण कुठल्या कुठे पोहोचू याचा विचारही केला नव्हता, असे मोदी म्हणाले. कणखर व्यक्तिमत्वात विनम्रतेचे भाव आणताना पक्षाच्या मुख्यालयात आपण आपल्या कामाचा हिशेब द्यायला आलो आहे, असे मोदी म्हणाले. देशाची लोकशाही आणि भाजपच्या संघटन सामर्थ्यांलाही आपल्या यशाचे श्रेय द्यायला ते विसरले नाहीत. मी तुमचाच एक साथीदार आहे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवर पक्षाने खूप मोठी जबाबदारी टाकली. पक्षाने तसेच छोटय़ा-मोठय़ा सहकारी कार्यकर्त्यांंनी केलेल्या संस्कारांमुळे हा विश्वास सार्थ ठरवू शकलो, अशी कृतज्ञतेची भावना मोदींनी व्यक्त केली. यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांंनी ‘पीएम,’ ‘पीएम’च्या घोषणा देत मोदींविषयी पक्षाच्या उंचावलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. कठोर परिश्रमाला पर्याय नसतो, हेही सांगायला ते विसरले नाहीत.
हेकेखोरपणा आणि एककल्ली वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या मोदींचा हा विनम्र अवतार अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारा ठरला.  
नितीशकुमारांना टाळले!
आज विज्ञान भवनात राष्ट्रीय विकास परिषदेत मोदींनी त्यांच्या समर्थक जयललिता, नवीन पटनाईक आणि अन्य मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन केले. अर्थमंत्री पी. चिदंबरम, आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद आणि कमलनाथ यांच्याशीही ते हास्यविनोदात रंगले. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी हस्तांदोलन तर दूरच, त्यांच्याकडे मोदींनी बघितलेही नाही. नितीशकुमार बसले असलेल्या भागाकडे ते फिरकलेच नाहीत. काही मुख्यमंत्री दुसऱ्या भागातही बसले आहेत, याचे छायाचित्रकारांनी स्मरण करून दिले असता स्मितहास्य करीत ‘जागरुक’ केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार काय, या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले. लखनौ हा वाजपेयींचा मतदारसंघ असल्यामुळे तिथून मोदींनी निवडणूक लढल्यास संबंध राज्यात भाजपचा माहोल होईल, असा तर्क दिला जात आहे.