२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजपची कामगिरी समाधानकारक नव्हती. अशा जागांवर पक्षाने लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी खास रणनीति बनवली आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ही योजना अंमलात येण्यासाठी सक्रिय झाले आहेत. संपूर्ण देशभरात भाजपचा विस्तार करण्यासाठी पक्षाने १२० अशा जागा शोधल्या आहेत. जिथे गत निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली नव्हती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागांवर चांगली कामगिरी करून यशस्वी होता येईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाला आहे. कायकर्त्यांनी लोकांशी संवाद कायम राखणे, पक्षाची विचारधारा आणि मोदी सरकारच्या कामांची माहिती लोकांना देण्याची सूचना करण्यात आली आहे.
देशभरात नुकताच झालेल्या निवडणुकांत भाजपला मिळालेल्या यशामुळे पक्षाचा थिंक टँक नवी रणनिती बनवण्यात व्यस्त आहे. आम्ही २०१४ मध्ये विजयी झालेल्या सर्व जागा कायम ठेवण्याचा दावा करू शकत नाही. पण याची शक्यता पडताळणे महत्वाचे आहे. पक्ष दक्षिण, पूर्व भागात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे. पक्षाकडून लवकरच अशा १२० लोकसभेच्या जागांची घोषणा केली जाईल, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘टाइम्स ऑफ इंडियाशी’ बोलताना सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांना औपचारिकरित्या कामगिरी देण्यात आली आहे. अमित शहा ९५ दिवसांत पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, लक्षद्विप आणि गुजरातचा समावेश आहे. पक्षाने ज्या १२० जागांची निवड केली आहे. त्यात या भागातील मतदारसंघांची संख्या मोठी आहे, असे संकेत मिळतात.
शहा यांनी नुकताच तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांना त्यांच्याच भागात आव्हान देण्यासाठी नक्सलवाडीपासून बूथ पातळीवरून मोहिमेची सुरूवात केली होती. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सत्ता प्राप्त करणे हे आपले प्राथमिक ध्येय असल्याचे अमित शहा यांनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळेच त्यांनी बूथ पातळीवरील मोहीम सुरू केल्याचे बोलले जाते. यापूर्वी ओडिशा येथे झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अमित शहा यांच्या ९५ दिवसांच्या भारत दौऱ्याची माहिती दिली होती.