काँग्रेसच्या यादीत चार माजी मुख्यमंत्री; राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्डशी आघाडी शक्य

उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असताना गोव्यासाठी सत्तारूढ भाजपने २९ जागांची, तर काँग्रेसने २७ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. भाजपने १८ आमदारांची उमेदवारी कायम ठेवली, तर काँग्रेसने चार माजी मुख्यमंत्र्यांना रिंगणात उतरविले. याशिवाय युनायटेड गोवन्स, गोवा फारवर्ड पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील युतीवर काँग्रेसने जवळपास शिक्कामोर्तब केले आहे.

बुधवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक मंडळाची बठक अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झाली. त्याचवेळी २९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती; पण अधिकृत घोषणा गुरुवारी सकाळी सरचिटणीस व केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी केली. त्यानुसार मावळते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर (मांद्रे) यांच्यासह अठरा आमदारांवर पक्षाने पुन्हा विश्वास टाकला आहे. अपवाद फक्त सेंट आंद्रेचे आमदार व प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वाघ यांचा. प्रकृतीकारणास्तव त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू रामराव वाघ यांना उमेदवारी दिली. आणखी दोन महत्वाच्या मतदारसंघांची घोषणा केलेली नाही. त्यामध्ये मायेम आणि कानकोनचा समावेश आहे. यापकी मायेम हा विधानसभा सभापती अनंत शेट, तर काणकोण हा आमदार रमेश तावडकर यांचा मतदारसंघ आहे. तिथे गटबाजी उसळून आल्यामुळे त्याबाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.

आणखी एका मतदारसंघाकडे लक्ष होते ते म्हणजे कुंभारजुये येथून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे आपला मुलगा सिद्धेशसाठी आग्रही होते. मात्र, तिथे भाजपने काँग्रेसमधून स्वगृही आलेले उपद्व्यापी आमदार पांडुरंग मडकईकर यांनाच तिकीट दिले आहे.

अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये राजेंद्र आर्लेकर (पेर्णे), राजेंद्र पाटनेकर (बिचोली), फ्रान्सिस डिसूझा (म्हापसा), दयानंद मांद्रेकर (साओली) आणि मायकेल लोबो (कलंगुट) आदींचा समावेश आहे.

राणे पिता-पुत्रांना संधी

दुसरीकडे, काँग्रेसचे सरचिटणीस मधुकर मिस्त्रींनी गुरुवारी काँग्रेसचीही यादी जाहीर केली. त्यामध्ये प्रतापसिंग राणे (पोरिम), रवी नाईक (फोंडा), दिगंबर कामत (मुरगाव) आणि लुईझिनो फालेरो (नावेली) या चार माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. फालेरो हे प्रदेशाध्यक्षदेखील आहेत. याशिवाय राणेंचे चिरंजीव विश्वजित यांनाही वाळपेई येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या पिता-पुत्राबरोबर चंद्रकांत कवळेकर (केपे) आणि सावित्री कवळेकर (सांगे)  या पती-पत्नीलाही काँग्रेसने संधी दिली आहे. चंद्रकांत कवळेकर हे मावळते आमदार आहेत.

राष्ट्रवादीला वास्को आणि बेनॅलिम हे दोन मतदारसंघ सोडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे समजते. या दोन जागांवर अनुक्रमे जोस फिलिप डिसूझा आणि माजी मंत्री चíचल आलेमाव हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. युनायटेड गोवन्स पक्षाचे नेते बाबूश मान्सेरात यांना चार जागा सोडण्यासही काँग्रेस राजी झाल्याचे दिसते. त्यानुसार बाबूश यांची पत्नी जेनिफर आणि सेंट आंद्रेंमधून फ्रान्सिस्को सिल्वेरांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्याचवेळी खुद्द बाबूश यांना हवी असलेली पणजीची जागा आणि सेंटक्रूझ येथे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

गोवा फारवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनाही फार्तोडा, साओलिम, सालिगाव आणि वेलीम या चार जागा हव्यात आहेत. अद्याप जागावाटपाचा तिढा संपलेला नसताना काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत सरदेसाईंना हव्या असलेल्या वेलीममधून फिलिप नेरी राड्रिग्जना उमेदवारी जाहीर केली आहे.

untitled-12