गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत पराभूत भाजपचे उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार अहमद पटेल यांच्या विजयास गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पटेलांवर कथितरीत्या भ्रष्ट वर्तणुकीचा आरोप करत त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी राजपूत यांनी केली आहे.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी राजपूत यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. पटेल राजपूत यांच्यात अटीतटीची लढत होती. त्या वेळी राघवजी पटेल, भोला गोहिल या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे मत रद्द ठरवले होते. या प्रकरणाची दि. २१ ऑगस्ट रोजी सुनावणी होऊ शकते. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना प्रत्येकी ४६ मते पडली होती, तर राजपूत यांना केवळ ३८ मतेच पडली होती.

राजपूत हे मुळचे काँग्रेसचे नेते होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी काही दिवस आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेही त्यांना राज्यसभेतील तिसऱ्या जागेसाठी उमदेवारी दिली होती. राजपूत यांना निवडणुकीत उभे करून अहमद पटेल यांचा पराभव करण्याचे भाजपचे नियोजन होते. पण काँग्रेसने बंडखोर आमदारांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला होता. त्यांचा आक्षेप योग्य ठरवत निवडणूक आयोगाने पटेल यांना विजयी घोषित केले होते. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. अत्यंत थोडक्या मतांनी राजपूत यांचा पराभव झाला होता. आता याप्रकरणी राजपूत यांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.