भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह लोकसभेसाठी जयपूरमधील बाडमेर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे भाजप पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेर मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी जसवंत सिंह इच्छुक होते. मात्र, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे जसवंत सिंह पक्षावर नाराज होते. जसवंत सिंह आपली अखेरची निवडणूक बाडमेर मतदारसंघातून लढविण्यावर ठाम होते. मात्र, पक्षाकडून शुक्रवारी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर बाडमेर मतदारसंघातून जसवंत सिंह अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीसुद्धा लोकसभेससाठी पसंतीच्या मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती.