राहुल गांधींचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षिस देणार असल्याचे फर्मान मध्यप्रदेशातील एका भाजप नेत्याने जारी केले आहे. भाजपचे मध्यप्रदेशातील प्रवक्ता आणि ‘मध्यप्रदेश उर्जा विकास निगम’चे अध्यक्ष विजेन्द्र सिंग सिसौदिया यांनी गुरुवारी (२३ जून) ‘राहूलचा पत्ता सांगा, एक लाख रुपये मिळवा’ अशी घोषणा जारी केली. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी विदेशात जेथे गेले आहेत तेथील पत्ता सांगणाऱ्याला आपल्या खिशातून एक लाख रुपये देणार असल्याचे सिसौदिया म्हणाले. काही महिन्यांपूर्वी देखील राहुल गांधी परदेशवारीवर गेले होते. ते चिंतन करण्यासाठी गेले असून, उर्जा प्राप्त केल्यानंतर तेथून परतणार असल्याचे काँग्रेसमधील काही लोकांनी त्यावेळी सांगितले होते, याची आठवण सिसौदियांनी करून दिली. परंतू राहुल गांधी थायलंड, मलेशिया, बँकॉक आणि सिंगापुर वारी करायला गेल्याचे नंतर समजल्याचे ते म्हणाले. आता पुन्हा त्यांच्यातील उर्जेत कमतरता निर्माण झाली असून, ते परत एकदा उर्जा प्राप्तिसाठी गेल्याचे काँग्रेसमधील काहीजणांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले. ते कुठे गेले आहेत? कोणाला भेटायला गेले आहेत? कशाप्रकारे उर्जाप्राप्ति करणार आहेत? आणि किती दिवस उर्जाप्राप्ति करणार आहेत? देशाला हे जाणून घ्यायचे आहे, असे देखील ते म्हणाले. काँग्रेसमधील कुणीही अथवा देशातील कोणताही नागरिक राहुल गांधींचा ठावठिकाणा सांगेल त्यास मी व्यक्तिगतरित्या एक लाख रुपये देईन. अशी मी घोषणा करत असल्याचे सिसौदिया गरजले.
दरम्यान सिसौदियांच्या वक्तव्यावर पलटवार करत मध्यप्रदेशातील काँग्रेसचे प्रवक्ता रवी सक्सेना म्हणाले की, भाजप नेते राहुल फोबियाने ग्रस्त आहेत. सिसौदिया भाजपमधील वरिष्ठ नेता आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना एसपीजी सुरक्षा प्राप्त असून, त्यांच्या दिनचर्येची माहिती त्यांना असते. इतके ज्ञान सिसौदियांना नसावे. राहुल गांधींच्या विदेश यात्रेबाबत जाणून घ्यायची इतकीच उत्कंठा असल्यास, त्यांनी दिल्लीस्थित आपले गृहमंत्री राजनाथ सिंग यांना एक लाख रुपये देऊन, त्यांना राहुल गांधींचा पत्ता विचारावा.