अरुंधती रॉय यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजप खासदार परेश रावल यांना भाजपच्याच महिला नेत्याने घरचा आहेर दिला आहे. परेश रावल यांनी दगडफेकीच्या वादात ओढायला नको होते असे भाजप नेत्या शायना एन सी यांनी म्हटले आहे.

लष्कराच्या जीपसमोर दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी अरुंधती रॉय यांना बांधायला हवे होते, असे ट्विट परेश रावल यांनी केले होते. या ट्विटवरुन वाद निर्माण झाल्यावर रावल यांनी ट्विट डिलीट केले आहे. परेश रावल यांना भाजप नेत्या शायना एन सी यांनीदेखील खडेबोल सुनावले आहेत. परेश रावल यांना त्यांचे मत मांडण्याचा हक्क आहे. पण त्यांना या वादात एका महिलेचा उल्लेख करणे टाळता आले असते अशी प्रतिक्रिया शायना यांनी ‘एएनआय’ला दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील दगडफेक करणाऱ्यांवर परेश रावल त्यांचे मत मांडू शकतात. सर्वसामान्यांच्या मनातही याच भावना आहे. पण या वादात एका महिलेला ओढणे अयोग्य आहे. एखाद्या महिलेची विचारधारा कोणतीही असली तरी तिच्याविषयी बोलताना विचार केलाच पाहिजे असे शायना म्हणाल्यात.

शायना यांनी परेश रावल यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली असली तरी भाजप नेते एस प्रकाश यांनी मात्र परेश रावल यांची पाठराखण केली आहे. परेश रावल हे ट्विटरवर नेहमीच उपहासात्मक टीका करतात. त्यावर वाद निर्माण करण्याची गरज नाही असे प्रकाश यांनी म्हटले आहे. परेश रावल यांनी ट्विट डिलीट केले असले तरी त्यावरुन सुरु झालेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. अरुंधती रॉय यांनी परेश रावल यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.