‘शक्तिमान’ वर शस्त्रक्रिया, एक पाय कापला; उत्तराखंडमधील सरकार अस्थिर करण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप
येथे एका निषेध मोर्चाच्या वेळी पोलीस दलातील शक्तिमान या उमद्या घोडय़ाला क्रूरपणे मारहाण करणरे भाजप आमदार गणेश जोशी यांना अटक करण्यात आली आहे. या आमदाराने घोडय़ास काठीने मारहाण केल्याने तो जखमी झाला व त्यामुळे त्याचा पाय तोडावा लागला आहे. आता तो कधीच पोलिसांच्या बंदोबस्त कामात सहभागी होऊ शकणार नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही आमदार गणेश जोशी यांना पक्षातून काढण्याची मागणी केली आहे. घोडय़ाला मारहाणीचे प्रकरण समाजमाध्यमांवर चर्चिले जात आहे.
गढवालचे पोलीस महानिरीक्षक संजय गुंजाल यांनी सांगितले, की मिसुरीचे आमदार गणेश जोशी यांना पटेलनगर येथील एका हॉटेलबाहेर अटक करण्यात आली आहे. आमदार गणेश जोशी व त्यांच्या साथीदारांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला होता. १४ मार्चला गणेश जोशी व त्यांच्या साथीदारांनी घोडय़ास क्रूरपणे मारहाण केली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की जोशी यांचे जाबजबाब घेण्यात येत असून, आमदारांना कुठे ठेवले आहे हे उघड करता येणार नाही. भाजपने आमदारांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, राज्यपाल के. के. पॉल यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यात केला आहे. उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांनी सांगितले, की जोशी यांना हॉटेलबाहेरून पळवून नेण्यात आले. साध्या वेशातील लोकांनी त्यांना पकडून नेले. ते पोलीस होते की गुंड अशी शंका आहे. भट्ट यांनी राज्यपाल पॉल यांची भेट घेऊन आमदारांचे अपहरण केल्याची तक्रार केली आहे. याच प्रकरणात नैनीताल जिल्हय़ातील प्रमोद बोरा यांना अटक करण्यात आली आहे. डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सदानंद दाते यांनी सांगितले, की बोरा व जोशी हे १४ मार्चला घोडा जखमी होण्यास कारणीभूत आहेत. दरम्यान, जखमी घोडय़ाचा पाय काल रात्री कापण्यात आला असून, त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे.
डॉक्टरांनी सांगितले, की मुंबईचे फिरोज खंबाटा यांच्या नेतृत्वाखाली शक्तिमानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शक्तिमानचे वजन ४ क्विंटल असून तो उभा राहू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांनी शक्तिमानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. भाजपने आमदार जोशी व इतरांवरचे खटले मागे घेण्याची मागणी केली आहे.

भाजपकडून आमिष -गोडियाल
डेहराडून: उत्तराखंडमध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच, काँग्रेस आमदाराने भाजपने राज्यातील रावत सरकार अस्थिर करण्यासाठी लालुच दाखवल्याचा आरोप केला आहे. भाजपने मात्र आरोप फेटाळले आहेत.काँग्रेस आमदार गणेश गोडियाल यांनी याबाबत आरोप केले आहेत. माझ्यासह आमदार मित्राला भाजप नेत्यांनी लालुच दाखवल्याचा त्यांचा आरोप आहे. तुम्ही काय पाहिजे ते मागा, मात्र सरकार अस्थिर करा अशी भाजपची रणनीती असल्याचा दावा गोडियाल यांनी केला. मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने हे आरोप फेटाळले आहेत अशी आमची प्रवृत्ती नाही, असा टोला विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांनी लगावला. लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले सरकार अस्थिर करण्याचा प्रश्नच येत नाही. दरम्यान सरकारला कोणताही धोका नसल्याचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सांगितले. ७० सदस्य असलेल्या उत्तराखंड विधानसभेत काँग्रेसचे ३६ तर भाजपचे २८ सदस्य आहेत. काँग्रेसला पुरोगामी लोकशाही आघाडीच्या ६ सदस्यांचा पाठिंबा आहे.